

Mangalsutras snatched from two elderly women on consecutive days
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात साखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच असून, सलग दोन दिवसांत दुचाकीस्वार भामट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मिनी गंठण ओरबाडून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटना मुकुंदवाडी आणि देवळाई (चिकलठाणा हद्द) परिसरात घडल्या असून, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आणि मंदिरातून परतणाऱ्या महिलांना चोरांनी लक्ष्य केले आहे.
पहिली घटना : मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र पळविले
पहिली घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भागातील महालक्ष्मी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. रुक्मिणी जनार्दन देशटवार (६०, रा. वीर सावरकर सोसायटी, महालक्ष्मी चौक) या नेहमीप्रमाणे कामगार चौक परिसरातील मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. फेरफटका मारून त्या पायी घरी परतत असताना समोरून एका दुचाकीवर तोंडाला मास्क बांधलेले दोन तरुण आले.
काही कळण्याच्या आतच पाठीमागे बसलेल्या लुटारूने रुक्मिणी यांच्या गळ्यातील १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र हिसकावले. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या प्रचंड घाबरल्या. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून दूरवर धूम ठोकली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक बहुरे तपास करत आहेत.
दूसरी घटना : मंदिरातून परतणाऱ्या आजींचे गंठण हिसकावले
दुसरी घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेआठ वाजेच्या देवळाई भागात कासलीवाल यांचे गंठण हिसकावताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सुमारास घडली. देवळाई परिसरातील श्रीकृष्ण नगरमध्ये रा-हणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिला अल्का कैलास कासलीवाला (७५) या त्यांचे पती कैलास कासलीवाल यांच्यासोबत बीड बायपास रोडवरील पुष्पदंत दिगंबर जैन मंदिरातून दर्शन घेऊन पायी घरी परतत होत्या.
सकाळी ८:३० वाजता योगी इंटरप्राईजसमोरून चालत असताना, समोरून एका लाला रंगाच्या मोटारसायकलवर दोन लुटारू (अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे) आले. त्यांनी अल्का यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले. या झटापटीत अर्धे गंठण तुटून त्यांच्या कपड्यात अडकून राहिले, तर ९ ग्रॅमचे अर्धे सोन्याचे गंठण चोरांनी घेऊन बीड बायपासकडे धूम ठोकली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम नगरगोजे करत आहेत.