

Garbage accumulated in the drain, risk of flooding due to unseasonal rains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात अवकाळी पावसाची शक्यता वाढत असताना नाल्यामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका गंभीर बनला आहे. अनेक भागांत पाण्याचा निचरा ठप्प झाल्याचे चित्र असून, महापालिकेच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाला तातडीने नाला सफाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील विविध भागांतील नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अंजली थिएटर परिसरातील नागेश्वरवाडी नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला आहे. औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानाजवळील नाल्यामध्येही अशीच परिस्थिती असून, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
तसेच निराला बाजार परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. मात्र येथेही नाल्यांची स्वच्छता होत नसल्याचे दिसून येत आहे. तर शिवसेना भवन परिसरातील नाल्यांमध्येही कचऱ्याचे ढीग साचले असून, स्वच्छतेचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, महापालिका दरवर्षी मान्सूनपूर्व नाला सफाई मोहिमेची घोषणा करत असली तरी प्रत्यक्षात कामे अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.
यंदा अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवरही नाल्यांची साफसफाई न झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंबधी नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनंतर सभापती अनिल मकरिये यांनी नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी साचलेल्या कचर्यामुळे नाल्यातील प्रवाह अडल्याचे दिसून आले.
यावरून शहरातील सर्वच नाल्यांची तातडीने सफाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असल्याने समस्या अधिक गंभीर होत आहे.
औरंगपुरा प्रभागातील नाल्याची पाहणी
हे तिन्ही नाले महापौर समीर राजुरकर व स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे निवडून आलेल्या प्रभागातील असून, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून सभापती मकरिये यांनी बुधवारी या नाल्याची पाहणी केली. त्यानुसार संबंधित विभागाला नाल्यातील साचलेला कचरा तातडीने हटवून संपूर्ण सफाई करण्याचे निर्देश दिले.