

Kavita Chavan Chairperson, Rajeshwar Hiwale Deputy Chairperson
गंगापूर : गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कविता रवींद्र चव्हाण यांनी विजय मिळवत सभापतीपद पटकावले, तर शिंदे सेनेचे राजेश्वर हिवाळे हे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले.
सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या कविता रवींद्र चव्हाण आणि उबाठा गटाचे रावसाहेब मोहन टेके यांच्यात सरळ लढत झाली. मतदानात कविता चव्हाण यांना १३ मते मिळाली, तर रावसाहेब टेके यांना ५ मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी विजय राऊत यांनी कविता चव्हाण यांना विजयी घोषित केले.
दरम्यान, उपसभापती पदासाठी शिंदे सेनेचे राजेश्वर कल्याण हिवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप भास्करराव सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रदीप सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजेश्वर हिवाळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेस सहाय्यक तहसीलदार नवनाथ वागवाड, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, अक्षय भालेकर, विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, अशोक घोडके तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुण राऊत यांनी सहकार्य केले.
दरम्यान, माळी वाडगाव गणातून तिसऱ्यांदा पंचायत समिती सभापतीपद मिळाल्याने या गणाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. यापूर्वी छाया अनिल वाघचौरे व भाऊसाहेब चव्हाण यांनीही सभापतीपद भूषवले असून आता कविता रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने तिसऱ्यांदा हा मान मिळाला आहे.
गंगापूर पंचायत समितीत पक्षनिहाय सदस्यसंख्या अशी आहे : भाजप – ६, शिंदे सेना – ५, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, उबाठा – २ आणि अपक्ष – २. या पार्श्वभूमीवर सभापती निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.