

Lured by the promise of profit, a childhood friend betrayed him
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने आपल्याच बालमित्राला तब्बल १ लाख ७२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इन्फिनीटी कॅपिटल नावाच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार ६ डिसेंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२६ या काळात न्यू विद्यानगर, सातारा परिसरात घडला. विनोद बबनराव राजगुरू (४८) आणि ईश्वरी विनोद राजगुरू (४४, दोघे रा. संग्रामनगर, सातारा परिसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.
फिर्यादी नितीन संताराम शिंदे (४४, रा. न्यू विद्यानगर, सातारा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा सातारा परिसरात संगणकाचा व्यवसाय आहे. आरोपी विनोद राजगुरु हा त्यांचा बालमित्र असल्याने त्यांचे राजगुरु कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. याच ओळ खीचा फायदा घेत ६ डिसेंबर २०२३ रोजी राजगुरू दाम्पत्य शिंदे यांच्या घरी आले.
त्यांनी आपण इन्फिनिटी कॅपिटल व कार्बोसायन्स मल्टिसर्व्हिसेस इंडिया कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या कंपनीत पैसे गुंतवल्यास दोन ते तीन महिन्यांत ३० टक्के नफा मिळतो आणि गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी पटवून दिले. बालमित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून शिंदे यांनी वेळ- ोवेळी १ लाख ७२ हजार रुपये राजगुरु दाम्पत्याकडे सुपूर्द केले. मात्र, मुदत संपल्यानंतर नफा तर मिळालाच नाही, शिवाय मूळ रक्कमही परत मिळेनाशी झाली.
शिंदे यांनी पैशांसाठी तगादा लावला असता, आरोपींनी त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार देत शिवीगाळ केली. तुला जे करायचे ते कर अशी धमकीही दिल्याने अखेर शिंदे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक रामकिसन काळे करीत आहेत.