

The commissioner ordered that a fine be imposed on the contractor who was digging up the road with a breaker
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केबल टाकण्याच्या कामासाठी महापालिकेसमोरील सिमेंटचा रस्ता ब्रेकरच्या सहाय्याने फोडणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी (दि.२३) महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत, अशी माहिती शहर अभियंता संजय कोंबडे यांनी दिली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले असून, तेथे बसवण्यात आलेल्या सर्व यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आयुक्त जी. श्रीकांत यांनी सभागृहातच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील सिमेंट रस्ते विनाकारण फोडण्याच्या प्रकारावर कठोर भूमिका घेत, सिमेंट रस्ते ब्रेकरने न फोडता कटरचा वापर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.
मात्र, या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या टप्पा क्रमांक ३ आणि मुख्य प्रशासकीय इमारतीदरम्यान असलेला सिमेंटचा रस्ता केबल टाकण्यासाठी ब्रेकरने फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. टप्पा क्रमांक ३ येथून मुख्य प्रशासकीय इमारतीकडे केबल नेण्यासाठी हे काम सुरू होते. हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संबंधित कामाची माहिती घेतली.
यावेळी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासंदर्भात शहर अभियंता संजय कोंबडे यांनी सांगितले की, संबंधित कंत्राटदाराला केबल टाकताना सिमेंट रस्ता फोडू नये, तसेच यापूर्वी ड्रेनेज लाईन टाकताना जेथे रस्ता फोडण्यात आला आहे, त्या मार्गातूनच केबल टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, काही ठिकाणी जागा अपुरी पडल्याचे कारण पुढे करत कंत्राटदाराने मर्यादित भाग ब्रेकरने फोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील सिमेंट रस्त्यांचे नुकसान टाळण्यासाठी भविष्यात अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.