

gangapur nagarpalika election
रमाकांत बन्सोड
गंगापूर : गंगापूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडप्रक्रिया शुक्रवारी (दि. २३) शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे निर्विवाद बहुमत असतानाही सत्ताकारणात समतोल राखण्याच्या भूमिकेतून विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात या समन्वय पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष संजय जाधव व उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे अधिकृत गठन करण्यात आले. या विशेष सभेत सर्वच पाचही समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाल्याने कोणताही वाद किंवा गोंधळ न होता सभेचे कामकाज पार पडले.
यावेळी राष्ट्रवादीचे पालिकेवर वर्चस्व असतानाही विरोधी पक्षातील भाजपचे नगरसेवक राकेश कळसकर यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती ही शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकाकडे या समितीचे नेतृत्व सोपवणे, हा राजकीय समन्वयाचा स्पष्ट संदेश असल्याचे बोलले जात आहे.
तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी वर्षा विशाल गायकवाड, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी सोनाली योगेश पाटील, तर नियोजन व वित्त समितीच्या सभापतिपदी सलमाजबीन अनिस कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आरोग्य व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अमोल जगताप कार्यभार सांभाळणार आहेत. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित विशेष सभेस सर्व नगरसेवकांसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सभापती व त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या परिसरात फटाके फोडून व जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
विकासाला गती मिळण्याची अपेक्षा
सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मतभेद बाजूला ठेवत समित्यांचे गठन केल्याने येत्या काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विकासाभिमुख धोरणे, पारदर्शक कारभार आणि सर्वपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून गंगापूर शहराच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याची भूमिका या समित्यांमार्फत घेतली जाईल, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.