

गंगापूर : शहरात वृद्ध महिलांना हेरून विश्वास संपादन करीत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या भामट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बसस्थानकात सोडण्याचे आमिष दाखवून ७० वर्षीय वृद्धेकडील सुमारे १२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. आठ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिल्लेगाव येथील साखराबाई हरीभाऊ आमराव (७०) या शुक्रवारी दुपारी २.१५ वाजता गंगापूर न्यायालयातील काम आटोपून छत्रपती संभाजी महाराज चौकात उभ्या होत्या. यावेळी दुचाकीवरील अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत, 'पुढे अपघात झाला आहे, मी तुम्हाला बसस्थानकात सोडतो,' असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आमराव दुचाकीवर बसल्या.
भामट्याने त्यांना जामगाव मार्गावरील चिंचेच्या झाडाजवळ नेले. तेथे 'गळ्यातील पोत पिशवीत ठेवा,' असे सांगितले. आमराव पोत काढत असताना त्याने ती रुमालात ठेवण्यास सांगितले आणि त्याचवेळी पोत लांबवून दुचाकीवरून पसार झाला. पोतीत २५ सोन्याचे मणी असून तिची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.
आठ दिवसांत दुसरी घटना
१५ ऑगस्ट रोजीही गणपती मंदिरात गेलेल्या लक्ष्मीबाई जाधव (८५) यांना पेढा देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेऊन चाकूचा धाक दाखवत सुमारे एक तोळ्याचे मंगळसूत्र लुटण्यात आले होते. अवघ्या आठ दिवसांत वृद्ध महिलांना लक्ष्य करून दोन घटना घडल्याने दुचाकीवरील भामट्यांची दहशत वाढली आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवता वृद्ध महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.