

नांदेड : शहरात संघटित गुन्हेगारी करून दहशत माजविणाऱ्या आणि टोळीयुद्धाला खतपाणी घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. 'मोक्का'अंतर्गत कारवाई झालेल्या एकाच टोळीतील ७ कुख्यात गुन्हेगारांचे नांदेड जिल्हा कारागृहातून राज्यातील विविध मध्यवर्ती कारागृहांत स्थलांतर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक(एसपी) डॉ. नीलभ रोहन यांनी पुढाकार घेत हा फार्मुला वापरला आहे.
नांदेड शहरात वर्चस्वाच्या वादातून हिंसक घटना घडवणे, जबरी खंडणी वसूल करणे आणि खुनाचे सुपारीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पोलीस प्रशासनाने 'मोक्का' लावून आरोपींना जेरबंद केले होते. हे सर्व सराईत गुन्हेगार नांदेड जिल्हा कारागृहात एकत्र बंदिस्त असल्याने त्यांच्यातील परस्पर संबंध, कारागृहातील अंतर्गत सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी पाठवलेल्या विशेष प्रस्तावाला मंजुरी देत, गृह विभाग व कारागृह महासंचालनालयाने न्यायालयाच्या परवानगीने खालील सराईत गुन्हेगारांची इतर मध्यवर्ती कारागृहांत रवानगी केली आहे.
नांदेड शहर व परिसरात बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या किंवा दहशत माजविणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीची गय केली जाणार नाही. शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन यापुढेही कठोर पावले उचलत राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी दिला आहे.
स्थलांतरित करण्यात आलेले गुन्हेगार
१. कैलास जगदीश बिगानिया
२. अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार
३. साईसिंग उर्फ लाला दिपकसिंह गैरहवार
४. ईश्वरसिंग जयवंतसिंग गीरणीवाले
५. सुरेंद्रसिंग उर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले
६. आशु पाटील उर्फ कमलेश बालाजी लिंबापुरे
७.मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफार बेग