

रमाकांत बन्सोड
गंगापूर तालुक्यात दुष्काळाच्या झळा आता प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सध्या ४० गावांत ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी तळाला गेली आहे. जायकवाडी धरणाच्या परिसरात तालुका असूनही, तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. लघु व मध्यम प्रकल्पांतील जलसाठा अत्यल्प शिल्लक राहिल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ३ गावांसह टैंकर भरण्यासाठी १० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच, आणखी १४ गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी ८ गावांची भूवैज्ञानिकांकडून प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली असून निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे.
'या' गावांची तहान टँकरवर सध्या तालुक्यातील दिघी,काळेगाव, नागापूर, नरसापूर, वैरागड, तांदूळवाडी, उत्तरवाडी, बोलठाण, शेकटा, वजनापूर, सुलतानाबाद, कोळघर, कणकोरी, काटेपिंपळगाव, जांभाळा, फुलशिवरा, आगाठाण, लासूर स्टेशन, हर्सल सावंगी, दायगाव, भानवाडी, बुट्टे वाडगाव, शंकरपूर, वसुसायगाव, जोगेश्वरी, वाळूज, येसगाव, जिकठाण, मिर्झापूर, सुलतानपूर, घोडेगाव, महेबूबखेडा,सिद्धनाथ वाडगाव, सिरेसायगाव, भोयगाव, देवळी, महमदपूर (मंजरपूर) आणि भागाठाण या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही दिवसांत दुष्काळाची झळ तीव्र होणार असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
खरीप वाया, रब्बीवरही संकट
पावसाच्या मोठ्या खंडामुळे यंदा खरीप हंगामातील कापूस, मका आणि बाजरी या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांवरही संकट ओढवले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पशुधनाचा प्रश्न, मजुरांचे स्थलांतर
शेतात पिके नसल्याने आणि माळरानावर गवत शिल्लक न राहिल्याने तालुक्यातील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या महागाईत विकतचा चारा घेणे पशुपालकांना परवडत नसल्याने जनावरे जगवायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे.