

छत्रपती संभाजीनगर : हर्मूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लागलेल्या आगीत २५०० मेट्रिक टन सुका कचरा जळून खाक झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी उपाययोजनांना वेग दिला आहे.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीसोबत भागीदारी केली जाणार असून, प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
हसूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रातील आगीत मोठ्या प्रमाणावर सुका कचरा जळाला. याशिवाय कचरा प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनेमुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबतच त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने दोन ठिकाणे सुचविली असून, त्यापैकी एका जागेची अंतिम निवड केली जाणार आहे. बीपीसीएल कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत या दोन्ही जागांची पाहणीही केली आहे.
येत्या १५ दिवसांत जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास बीपीसीएलसोबत प्रकल्प उभारणीचा करार केला जाईल. कंपनीकडून अन्य दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने जागा निश्चित करून दिल्यानंतर शहरातील प्रकल्पाच्या उभारणीला कंपनीकडून सुरुवात केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
दरम्यान कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रक्रिया सुरू झाल्यास ओल्या कचऱ्यापासून निघणाऱ्या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका होईल.
आगीत दोन मशीनही खाक
हर्सल कचरा प्रक्रिया केंद्रातील आगीत २५०० मेट्रिक टन सुका कचरा जळून खाक झाला. कचरा प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशीनचेही नुकसान झाले. या घटनेनंतर ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा पर्याय पुढे आला आहे. हा प्रकल्प तडीस गेल्यास उर्जा उत्पनातनू सुध्दा मनपाला आर्थिक फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.