12 Year Old Boy Death
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात रविवारी (१४ ऑगस्ट) घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावात किराणा आणायला गेलेल्या १२ वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण याचा अज्ञाताने खून करून मृतदेह विहीरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला असून त्याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने बाबत माहिती अशी की,हकीकतपूर शिवारातील शेतवस्तीवर राहणारा सिद्धार्थ दि.१४ रोजी दुपारी ३ वाजता किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडला. तासाभरानंतर भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी आणि १०० रुपये जमिनीवर पडलेले आढळले. त्या ठिकाणी रक्ताचे डागही होते, जे सुमारे १०० मीटर अंतरावरील विहिरीकडे जात होते. प्रथम त्याच्यावरती जंगली श्वापदाने हल्ला केला असल्याचे प्राथमिक अंदाज काढला होता मात्र जवळपास जंगली श्वापदाच्या पायाचे ठसे दिसून आले नाही. त्यानंतर जवळच असलेल्या विहीरीजवळ अधिक रक्ताचे डाग दिसल्याने अपघाताऐवजी काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव गावकऱ्यांना झाली त्यांनी तात्काळ गंगापूर पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.
गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा करून शोधमोहीम हाती घेतली. रात्री ८:४५ वाजता स्थानिकांनी गळ टाकून विहीरीतून सिद्धार्थचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्याचा हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवला गेला, मात्र घटनास्थळी कोणत्याही प्राण्याचे ठसे न आढळल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत रात्री उशिरा सिद्धार्थची आई सुरेखा विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच्या पार्थिवावर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर १५ ऑगस्टला दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे व पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय पाखरे, मनोज घोडके व पो. शि. संदीप राठोड करत आहेत.