

गंगापूर : १२ वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी ३ वाजता उघडकीस आली. सिद्धार्थ विजय चव्हाण (वय १२) असे या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हकीकतपूर शिवारातील शेतवस्तीत राहणारा सिद्धार्थ शुक्रवारी दुपारी सायकलवरून किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान गावातील काही लोकांना भारत दारुंटे यांच्या शेताजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी व १०० रुपये आढळून आली. तसेच त्या ठिकाणी काही रक्ताचे डागही आढळून आले. हे डाग १०० मीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीपर्यंत आढळून आले. विहिरीजवळ रक्ताचा सडा पडलेला आढळून आल्याने सिद्धार्थचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी विहिरीत शोध घेऊन सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला.
सुरुवातीला बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राण्याने सिद्धार्थवर हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवला आला, मात्र घटनास्थळी कोणत्याही प्राण्याचे ठसे न आढळल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सिद्धार्थची आई सुरेखा विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे व पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय पाखरे, मनोज घोडके व पो. शि. संदीप राठोड करत आहेत. हा खून कोणत्या कारणातून झाला व कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.