

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारात नांदूर मध्यमेश्वर कालवा रस्त्यावर सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता मोटर सायकल व स्कार्पिओ यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला . यामध्ये तरुण दांपत्यासह एका वर्षाच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओ (एमएच १९ बीयू ४२१४) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की मोटारसायकलवरील तिघे हवेत फेकले जाऊन शेतात जाऊन पडले. या मध्ये सजन राजू राजपूत (२८) – वाळूज शितल सजन राजपूत (२५) व त्यांचा एक वर्षाचा मुलगा कृष्णांश यांचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील रहिवासी असलेले कुटुंब वाळूज औद्योगिक वसाहतीत वास्तव्यास होते.
सुट्टीच्या निमित्ताने ते मूळ गावी सटाणा येथे गेले होते. परत वाळूजला निघालेल्या या कुटुंबाचा प्रवास मात्र दुर्दैवी ठरला. अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी हंबरडा फोडत हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले.१०८ रुग्णवाहिका सेवेकडून तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. विशाल सुर्यवंशी व डॉ. मुजम्मिल शेख यांनी तपासल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले.या अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात झाली असून पोहे कॉ. विनोद बिघोत यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.