नाशिक : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील सखल भागात पाणी साचत आहे, तर ग्रामीण भागात शेतांचे रूपांतर तळ्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वरुणराजा जोरदार बरसत असल्याने, नदी- नाले खळाळून गंगापूर धरणात 98.56 टक्के जलसाठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 75 ते 85 टक्के पाणीसाठा करण्याची परवानगी आहे. परिणामी, पाटबंधारे खात्याने पहिल्या टप्प्यात तीन हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे 'गोदावरी'ला हंगामातील सातवा पूर वाहू लागला आहे.
गंगापूर धरण समूहातून एकूण तीन हजार ७५२ क्यूसेक वेगाने विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरीत जलस्तर पुन्हा उंचावल्याने गोदाकाठच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. रामकुंड परिसरातील टपरीधारकांनाही सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आल्याने बुधवारी (दि. २७) जलधारांमध्येच बाप्पाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत गंगापूर धरणातून 80 हजार 769 क्यूसेक वेगाने 6 हजार 981 दलघफू पाणी, तर नांदूरमध्यमेश्वर बंधारामार्गे जायकवाडीला 1 जूनपासून आतापर्यंत 55 टीएमसी (५४ हजार ९४५ दलघफू) पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर धरणात सध्या 98 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी याचवेळी 90 टक्के होता. सध्या गंगापूर धरण केवळ दीड टक्के रिकामे असून, पाण्याची आवक आणि विसर्गचे प्रमाण पाहता, येत्या आठवडाभरात धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 12 प्रकल्प काठोकाठ भरले असून, 7 धरणे 90 टक्क्यांच्या पुढे आहेत. नाशिकमध्ये बुधवारी आणि शुक्रवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट असणार आहे.
होळकर पुलाखालील सांडव्यावरून वेगाने पाणी प्रवाहित होत असल्याने गोदाकाठावरील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. वाहन पार्किंग, भाजीबाजार बंद केला असून, धार्मिक कार्येही स्थलांतरित करण्यात आली आहेत. नाशिक महानगरपालिका अग्निशमन दलाची वाहने गोदाकाठावर गस्त घालत असून, सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनीही पुढाकार घेतला असून, भाविकांना नदीकाठापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.