

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव गुरूवारी (दि. २८) एकाच दिवशी आले आहेत. अनंत चतुर्दशीला विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला जातो. तर ईद-ए-मिलादनिमित्त लाखो मुस्लिम भाविक प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या पहेरान-ए-मुबारकचे दर्शन घेण्यासाठी खुलताबादला जातात. हा मार्ग दौलताबाद येथून जातो. विसर्जन मिरवणूक काढल्यास मुस्लिम बांधवांच्या प्रवासाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने दौलताबादच्या गणेश मंडळांशी चर्चा करून तेथील विसर्जन मिरवणूक एक दिवस पुढे ढकलून हिंदू-मुस्लिम भाईचारा हा संदेश देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. (Chhatrapati Sambhajinagar News)
पुण्यात गणरायाच्या विसर्जनासाठी मुस्लिम समाजाने यंदा प्रेषित मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस (मिरवणूक) पुढे ढकलून १ ऑक्टोबररोजी हा जुलूस काढण्याचे नियोजन केले. हिंदू-मुस्लिम भाईचारा हा संदेश देणारी वार्ता ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिस आयुक्तांच्या समन्वयाने एकोप्याचा निर्णय घेण्यात आला. २८ सप्टेंबरला सर्वत्र लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. ढोल ताशा, डीजेच्या जल्लोषात विसर्जन मिरवणुका निघतात. (Chhatrapati Sambhajinagar News)
दौलताबाद येथेही सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने मोठी विसर्जन मिरवणूक काढली जाते. तर, ईद-ए- मिलाद निमित्त जिल्ह्यातील लाखो भाविक खुलताबाद येथे दर्शनासाठी जातात. शहरातून जाणाऱ्या मुस्लिम भाविकांची संख्या मोठी असल्याने दौलताबाद येथे वाहतूक कोंडी होऊन भाविकांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे पोलिस आयुक्त लोहिया यांनी दौलताबाद येथील गणेश मंडळांसोबत चर्चा केली. त्यांच्यापुढे विसर्जन एक दिवस पुढे ढकलण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वच गणेश मंडळांनी तयारी दर्शविली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच दौलताबाद येथील विसर्जन मिरवणुका ११ व्या दिवशी निघणार आहेत.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचे पहेरान-ए-मुबारक हे दर्शन घेण्यासाठी खुलताबाद येथे ठेवले जातात. त्यात प्रेषितांचे काही कपडे आणि मिशीचे केस असतात. त्यासाठी जिल्ह्यातील लाखो भाविक 27 सप्टेंबरच्या रात्रीपासूनच खुलताबाद येथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. ईद-ए-मिलादनिमित्त दिवसभर दर्शन घेतले जाते.
शहरातून जवळपास साडेतीन ते चार लाख भाविक खुलताबादला जातात. त्यांच्यासाठी जाण्याचा मार्ग हा दौलताबाद टी- दौलताबाद गाव ते खुलताबाद असा असणार आहे. मात्र शहरात पतरण्याचा मार्ग हा पुढे वेरूळला जाऊन धुळे-सोलापूर महामार्गाने छत्रपती संभाजीनगर, असा देण्यात आला आहे. खुलताबादहून परतणाऱ्यांनी हाच मार्ग वापरावा, असे आवाहन लोहिया यांनी केले आहे.
हेही वाचा