

Free water meter for houses up to 600 sq ft.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका येत्या डिसेंबरपासून शहरवासीयांना नव्या जलवाहिनीतून नियमित व मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र हे पाणी देताना महापालिका प्रत्येक नळांना स्मार्ट वॉटर मीटरही बसविणार आहेत.
परंतु शहरातील २० बाय ३० च्या म्हणजेच ६०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांतील नळांना हे मीटर मोफत बसविले जाणार आहे, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. त्यासोबतच अशा दीड लाख मालमत्ता असतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
शहरासाठी टाकण्यात येत असलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे आहे. येत्या डिसेंबरपासून जलवाहिनीतून शहरवासीयांना या २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बर्यापैकी मार्गी लागणार आहे.
शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करता येणार आहे. मुबलक पाणीपुरवठ्यासोबतच आता महापालिका नळांना स्मार्ट मीटर लावण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या कामासाठी महापालिका लवकरच एजन्सी नियुक्त करणार आहे. नागरिकांना या मीटरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, मीटरच्या किमतीसह त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून त्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी शहरातील ६०० चौरस फूट व त्यापेक्षा कमी आकाराच्या घरांना महापालिका हे स्मार्ट वॉटर मीटर मोफत देणार आहे.
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, छोट्या घरांना मोफत वॉटर मीटर देण्याचा ठराव महापालिकेने घेतला आहे. सुमारे ६० टक्के मालमत्ता या ६०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या असतील, असा अंदाज आहे. त्या सर्वांना हा लाभ दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबरपासून शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार असले तरी नळांना स्मार्ट मीटर बसणार असल्याने पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे.
शहरात ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी दाखल होत आहे. तसेच १२०० आणि ७०० मिमीच्या जलवाहिनीही सुरू असल्याने शहरात १६४ एमएलडी पाणी दररोज येत आहे. त्यामुळे शहराच्या ७० ते ८० टक्के भागांत आता पाचव्या दिवशी पाणी येत आहे.
शहरात १९०० किलोमीटर लांबीच्या अंतर्गत पाणी वितरणाच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहे. त्यापैकी सध्या १२०० किलोमीटरपर्यंत काम झाले आहे. यातील बहुतांश जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा केला जात असून, या जलवाहिन्यांवर नळ कनेक्शन देण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत आहे. त्यांच्यामार्फत ९० हजार कनेक्शन दिले जाणार आहेत.