

Fraud of lakhs in the name of fake educational institution
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नोंदणीकृत संस्थेच्या नावावरून लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (छत्रपती संभाजीनगर) या संस्थेच्या नावावरून नवनिसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुणे अशी बनावट संस्था स्थापन केल्याचा आरोप दोघा बापलेकांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष मारुती कोद्रे आणि प्रसाद सुभाष कोद्रे (दोघे रा. कोद्रे मैदान, केशवनगर, मुंढवा, पुणे) यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी वकील कृपाल कृष्णराव पलुस्कर (३९, मांजरी बुद्रुक, ता. हवेली, पुणे) यांच्या तक्रारीनुसार, २०१६ साली पलुस्कर आणि प्रसाद कोद्रे हे हडपसर येथील आदर्श पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक होते. पलुस्कर यांनी राजीनामा देऊन नवीन संस्था पुणे येथे सुरू करत असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रसाद कोद्रे यांनी आपल्या वडिलांच्या नावावर छत्रपती संभाजीनगर येथे नोंदणीकृत निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था असल्याचे सांगून नवीन संस्था उघडण्याचा वेळ आणि खर्च वाचविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नवीन कार्यकारिणी गठित झाली.
पलुस्कर यांनी आर्थिक खर्च करायचा असे ठरले. त्यांना अध्यक्ष, प्रसाद कोद्रे सचिव आणि सुभाष कोद्रे सदस्य केले. संस्थेच्या माध्यमातून के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे महाविद्यालय सुरू झाले. कौटुंबिक अडचणीमुळे पलुस्कर काही काळ संस्थेच्या कामकाजात सक्रिय नव्हते. या संधीचा फायदा घेत कोद्रे बापलेकाने नवनिसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुणे या नावाने नवी संस्था नोंदवली. पलुस्कर आणि इतर चार सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली गेली. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी चूक झाली म्हणून तोंडी माफी मागितली; मात्र त्यानंतरही गैरव्यवहार सुरूच राहिले. बँक स्टेटमेंट मागितल्यावर टाळाटाळ केली.
बनावट ऑडिट रिपोर्ट आणि धमक्या
पलुस्कर यांनी माहिती अधिकारातून चौकशी केली असता, २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीतील संस्थेचे ऑडिट रिपोर्ट सुभाष कोद्रे अध्यक्ष आणि प्रसाद कोद्रे सचिव या नावाने सादर करण्यात आल्याचे उघड झाले. त्या सर्व दस्तऐ-वजांवरील स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या बँक व्यवहारांची माहिती देण्यास दोघांनी टाळाटाळ केली. उलट तू काही करू शकत नाहीस, जे करायचे ते कर, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
३० नोव्हेंबर २०२२ रोजी पलुस्कर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती, मात्र ती दिवाणी स्वरूपाची असल्याचे सांगून पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता. शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार क्रांती चौक पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.४) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.