

Paithan Uddhav Thackeray's criticism of the government
पैठण/दावरवाडी, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून महायुती सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार स्वतःचे भले करण्यात दंग झाले असून, महायुती सरकारने पोकळ आश्वासन दिल्यावर बळीराजाच्या हातात काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत संकटात असलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना उबाठा खंबीरपणे उभे राहणार असल्याचे वचन पैठण तालुक्यातील नांदर येथे बुधवारी (दि.५) आयोजित शेतकरी संवादाप्रसंगी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी व पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदान न देता स्वतःच्या फायद्यात दंग झाले आहेत. अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने अडचणीत असलेल्या शेतकरी, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात पैठण तालुक्यातून केली.
शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत प्रथमच नांदर येथे भेट देऊन शेतकरी व नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असल्याचे वचन यावेळी देऊन पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम आतापर्यंत जमा न झाल्यामुळे ही बाब राज्य सरकारची फार मोठी शोकांतिका आहे, असे म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले. या तालुक्यातील नुकसानीबद्दल वास्तविक माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांनी घेतली.
याप्रसंगी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, विनोद घोसाळकर, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, राजेंद्र राठोड, दत्ता गोर्डे, डॉ. सुनील शिंदे, मनोज पेरे, राजू परदेशी, सुरेश दुबाले, सोमनाथ जाधव, राखीताई परदेशी, किशोर वैद्य, अजय परळकर, कल्याण मगरे, स्वाती माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पैठण शहरावर लादला पूर
उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागातील गावात जाऊन व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी, नागरिकांनी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्र्यांचा खासदार, आमदार यांचा पाढा वाचून स्वतःचा भले करण्यात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दंग असल्याच्या भावना व्यक्त केल्या. पैठण येथील नाथसागर धरणातून गोदावरी नदीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे नियोजन करून पाणी सोडले. पैठण शहरावर लादण्यात आलेल्या पुराच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली आहे.