

Foreign funding worth crores to set up a call center?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा एमआयडीसीत बोगस कॉल सेंटर सुरू करून अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरीच्या प्रकरणात कारवाईची भीती फारुख ऊर्फ घालून दररोज फारुकी कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला होता. सहा प्रमुख आरोपींसह ११४ जणांना अटक केली. मात्र, कारवाईची भनक लागताच मास्टरमाइंड अब्दुल फारूख मुकदम शाह ऊर्फ फारूखी शहरातून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस करत गोवा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
पोलिस बुधवारी रात्री उशिरा फारुकीला घेऊन शहरात दाखल झाले. दरम्यान, फारुकीला कॉल सेंटरचा सेटअप उभारणीसाठी शेकडो संगणक, लॅपटॉप, मोबाईल, इमारत भाडे, आलिशान गाड्या अशी कोट्यवधींची फॉरेन फंडिंग झाल्याचा संशय बळावला आहे.
अधिक माहितीनुसार, भावेश प्रकाश चौधरी (३४, रा. अहमदाबाद), भाविक शिवदेव पटेल (२७, रा. मुंबई), सतीश शंकर लाडे (३५, रा. अहमदाबाद), वलय पराग व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी याना मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी भाविकला पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी आणून कार्यपद्धती समजून घेतली. अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरी, लोन फॉडमध्ये नाव आल्याची भीती घालून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून कोड रिडिम करून डॉलरची रक्कम बिटकॉइन आणि त्यानंतर रुपयात रूपांतरित करून लूट केली जात होती. याचा प्रमुख जॉन नामक व्यक्ती व्हर्टूअली टोळीशी जोडलेला होता.
फारुकी कॉल सेंटर सुरू करून नॉर्थ ईस्ट भागातील तरुण तरुणींना कॉल सेंटरमध्ये नोकरीची आमिष दाखवून दिल्ली मार्गे शहरात घेऊन आला. अनेक तरुण तरुणी यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी फ्रॉड कॉल सेंटरवर काम करून इकडे आलेले आहे. त्यामुळे ज्यांना अनुभव नाही अशांना अमेरिकन लोकांना इंग्लिशमध्ये कसा संवाद साधायचा याची स्पेशल ट्रेनिंग देण्यात आली. ही ट्रेनिंग देणारा पोलिसांच्या रडारवर आला आहे. एक तयार स्क्रिप्ट वाचून दाखवली जायची. नागरिकाने प्रतिप्रश्न केला तर त्याला असे उत्तर द्यावे याचेही कौशल्य या तरुणांना दिले होते.
टोळीचा प्रमुख जॉन कुठे?
या टोळीचा प्रमुख जॉन नावाचा व्यक्ती ऑनलाईनद्वारेच फारुकीसोबत संपर्कात होता. तोच अमेरिकेतील व्यक्तींचा डेटा मिळत होता. व्हॉट्सअॅप कॉलद्वारे फारूकी जॉनशी संपर्कात असायचा. या संपूर्ण गोरखधंद्यात ४५ टक्के वाटा जॉनचा, तर उर्वरित ५५ टक्के फारूकी आणि टोळीचा होता. मात्र, हा जॉन नेमका आहे कोण? तो कुठे आहे याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
कायद्याची भीती घालून ओढायचे जाळ्यात
अमेरिकेत न्यायालय, तपास यंत्रणांची तेथील नागरिकांना प्रचंड भीती आहे. याचाच फायदा घेऊन ही टोळी नागरिकांना तुम्ही टॅक्स चोरी केल्याने तुमच्यावर कारवाई होणार आहे अशी न्यायालयाची बनावट नोटीस पाठवून अगोदर भीती घालत. त्यानंतर त्याचा परत कॉल येताच यातून बाहेर पडण्यासाठी पैसे कार्डद्वारे भरण्यास सांगून ही रक्कम टोळीचे भामटे लुटायचे. यासाठी हायटेक यंत्रणाचा वापर करण्यात येत होता.
फारुकी १२ वर्षापासून शहरात
फारुकी मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो गेल्या १२ वर्षांपासून गारखेडा परिसरात स्थायिक आहे. मात्र, तो सायबर भामट्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो परराज्यात व परदेशात जाऊन जाळे विणू लागला. गुजरातच्या गुंतवणूकदारांना हाताशी धरून त्याने अमेरिकन लोकांची फसवणूक करण्याचा डाव आखला. पश्चिम बंगाल येथील हॅकर्सच्या मदतीने जॉनच्या संपर्कात आला. डेटा मिळत गेल्याने कॉल सेंटरचा खेळ त्यांना जमून गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने तपासासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. प्रमुख तपासाधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या सोबत मदतीला एपीआय मोसिन सय्यद, पीएसआय अमोल म्हस्के, उत्रेश्वर मुंडे, लालखान पठाण, छाया लांडगे, नितीश सुंदर्डे यांची नियुक्ती केली आहे.
मदतीला महाराष्ट्र सायबरची टीम दाखल
शहर पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी महाराष्ट्र सायबर मुख्यालयातून अविनाश गुळवे, मीलन सदडीकर हे दोन अधिकारी दाखल झाले आहेत. गीता बागवडे यांचे पथक आता संपूर्ण रॅकेटचे आर्थिक व्यवहार, विदेशी बँक खात्यांद्वारे झालेले पैसे ट्रान्सफर, हवाला नेटवर्क, तसेच परदे-शातील कॉल सव्र्व्हरचा शोध घेऊन पुरावे गोळा करणार आहे. पोलिसांनी बुधवारी पंचनामा करून १०६ लॅपटॉप, १४६ मोबाईल फोन आणि तब्बल ७आलिशान कार जप्त केल्या आहेत. लॅपटॉप अमेरिकन सव्र्व्हरशी थेट कनेक्ट होऊन तिथल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वापरले जात होते. फॉरेन्सिक पथकाने संपूर्ण डिजिटल डेटा सुरक्षित केला असून, त्याचे विश्लेषण झाल्यानंतर आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
कोणत्या मार्गाने आला पैसा?
आरोपी फारुकी याचे पोलिस रेकॉर्ड तपासणार आहेत. त्याने कॉल सेंटर सुरू करण्यासाठी दरमहा लाखो रुपये भाडे मोजून प्रशस्त दोन मजल्यावर कॉल सेंटरचा सेटअप उभारला. कॉर्पोरेट ऑफिसचे फर्निचर केले. शेकडो लॅपटॉप, मोबाईल, हायटेक इंटरनेट यंत्रणा, महागडे सॉफ्टवेअर, सायबर हॅकर्सची टोळी तयार केली. अमेरिकन लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी नॉर्थ ईस्ट भागातील तरुण तरुणींना पगार व कमिशनवर टोळीत सहभागी केले. मात्र, यासाठी फारुकीकडे कोट्यवधीची रक्कम आली कोठून ? यात फॉरेन फंडिंग झाली का? याचाही तपास होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस महासंचालक कार्यालयाचे लक्ष या प्रकरणाकडे आहे.