

Five people attack a family over a money dispute
संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उसने दिलेल्या पैशाच्या वादातून पाच जणांनी एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती पत्नीसह त्यांचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राजनगर, मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी धम्मू झिंझोरडे, प्रशांत हिवाळे, शुटर, जया आणि जयाची बहीण आदींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीराजी शामराव शिंदे (३९, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांनी धम्मू झिंझोरडेकडून पैसे उसने घेतलेले होते. २१ ऑगस्ट रोजी झिंझोरडे याने पैसे मागण्यासाठी शिंदे यांना फोन केला. फोनवर शिंदे यांनी पैसे परत केल्याचे सांगितले. यामुळे धम्मू भडकला व त्याने फोनवरून शिवीगाळ करणे सुरू केले. दरम्यान काही वेळातच धम्मू झिंझोरडे, प्रशांत हिवाळे, एक शूटर, जया व तिची बहीण असे पाच जण लाकडी दांडे व लोखंडी रॉड घेऊन शिंदे यांच्या घरी पोहोचले.
या पाच जणांनी प्रथम शिंदे यांच्या घरावर दगडफेक केली, नंतर घरात घुसून शिंदे यांच्या पत्नी व मुलांना मारहाण केली. या पाच जणांसोबत आलेल्या जया नावाच्या महिलेने शिंदे यांच्या पत्नीचे केस पकडून जमिनीवर आपटले. अचानक हल्ला झाल्याने शिंदे बाहेर पळाले. त्यांना धम्मू, प्रशांत व शूटर यांनी पकडून लाकडी दांडक्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मराहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.