

छत्रपती संभाजीनगर : शहरातील निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नायलॉन मांजा माफियांविरोधात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर पावले उचलली आहेत. बजाजनगर भागात छापा टाकून पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आणि त्याच्या चौकशीतून नायलॉन मांजाचे मोठे रॅकेटच उघडकीस आले. एकाच रात्री सोमवारी (दि.15) पाच वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत गुन्हे शाखेने जीवघेणा मांजा विक्री करणाऱ्या पाच मित्रांच्या मुसक्या आवळून 300 गट्टू जप्त केले.
रुद्राक्ष संतोष बुरसे (22, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी), भागवत अंबादास जाधव (20, रा. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी), रोहन राजेंद्र ढेंगळे (20) आणि संदीप राजू डोईफोडे (20, रा. वडगाव कोल्हाटी, चौघे रा. बजाजनगर) तर राज विनोद जगताप (20, रा. डिंबारगल्ली, बेगमपुरा) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून मांजाचे 300 गट्टू जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. हे पाचही आरोपी एकमेकांचे मित्र असून, त्यांनी शहराच्या विविध भागांत या जीवघेण्या मांजाची विक्री करण्याचे जाळे पसरवले होते.
अधिक माहितीनुसार, मकर संक्रांतीचा सण जवळ येत असताना शहरात पतंगबाजीसाठी मोठ्याप्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला जातो. उच्च न्यायालयाने आणि राज्य शासनाने प्रतिबंध घालूनही छुप्या मार्गाने मांजा शहरात आणून विक्री केला जात असल्याचे समोर आले होते.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला रांजणगाव ते वाळूज रोडवरील पुष्पनगरी येथील दुकानात बुरसे हा मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने छापा मारून त्याला अटक केली. त्याच्याकडून 51 मांजाचे गट्टू जप्त केले. त्याच्या चौकशीत त्याचा मित्र भागवत जाधवचे नाव समोर येताच त्याच्या घरी छापा मारून 144 गट्टू, त्यानंतर दुसरा मित्र राज जगतापकडून 23 गट्टू जप्त केले. भागवतच्या चौकशीत त्याचा मित्र रोहन ढेंगळे यांच्याकडे 26 गट्टू मिळाले. तर बेगमपुरा येथील संदीप डोईफोडे यांच्याकडे छापा मारून 46 गट्टू जप्त केले.