

Fire breaks out in a house in a society in Dashmesh Nagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील दशमेश नगर परिसरातील देवा हाईट्स सोसायटीच्या वॉचमनच्या घराला रविवारी (दि. १५) दुपारी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अधिक माहितीनुसार, दशमेश नगर येथील देवा हाईट्स सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या वॉचमनच्या खोलीला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे स्वरूप पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती चिराग पाटणी यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवली. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी रवाना झाला.
उप अग्निशमन केंद्र अधिकारी कदम, ड्युटी अधिकारी संजय कुलकर्णी व हरीभाऊ घुगे, जवान सचिन शिंदे, यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वॉचमन नितिन निसर्गंध यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.