

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कुशल कामांचा थकीत असलेला तब्बल १५१ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी अखेर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. डिसेंबरपासून रखडलेला हा निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील कामांना दिलासा मिळाला असला तरी, अजूनही जवळपास ५० कोटींचा निधी थकीत असल्याची माहिती रोहयो विभागाच्या सूत्रांनी दिली.
रोहयोमधून मजुरांना १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. सिंचन विहीर, घरकुल, शेत-तळे, मोहगणी लागवड, फुलशेती, साठवण तलाव, शाळा संरक्षण भिंत अशा विविध कामांचा यात समावेश असतो. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांत कामांना मंजुरी देताना ६०-४० चे प्रमाण बिघडले. अकुशल कामांचा निधी मिळत असला तरी कुशल कामांचा निधी डिसेंबरपासून मिळालाच नव्हता, त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. सूत्रांनी सांगितले की, नुकताच मिळालेला निधी हा गेल्या तीन ते चार वर्षांच्या कामांचा थकीत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांच्या उपजीविकेशी निगडित कामे या निधीमुळे गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र अजूनही थकीत असलेले ५० कोटी तातडीने मिळाले नाहीत तर कामांचा वेग मंदावण्याची शक्यता सूत्रांनी नाकारलेली नाही.