

Police raid in Waluj; Parcel containing 2,500 bottles of drugs seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कुरियर, ट्रान्सपोर्ट, पार्सलद्वारे अमली पदार्थ तस्करी सुरू असल्याचे पुढारीने समोर आणल्यानंतर एनडीपीएस पथकाने दहा दिवसांपूर्वी नशेच्या औषधीचे पार्सल ने-आन करणाऱ्या आर-ोपीसह ट्रॅव्हल्स जप्त केली होती. त्यानंतर आता वाळूज भागातील नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीत शुक्रवारी (दि.१२) छापा मारून तब्बल अडीच हजार रायटस नावाच्या नशेच्या औषधीचे पार्सल जप्त केले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार स्वतः कारवाईच्या ठिकाणी हजर होते, हे विशेष.
शहरात अमली पदार्थ तस्करीचे प्रकार मोठ्याप्रमाणात सुरू असून टॅव्हल्स, पार्सल, कुरियरने होणाऱ्या तस्करीचे प्रकार एनडीपीएसच्या पथकाने यापूर्वी उघड केले होते. मात्र, आता तस्कर ट्रान्सपोर्टचा देखील वापर करत असलयाचे समोर आले आहे. एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे यांना वाळूज भागातील शिवराई शिवारात असलेल्या व्हीआरएल लॉजिस्टिक या कंपनीत नशेच्या औषधींचे पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
यावरून त्यांनी वरिष्ठाना कळवून सकाळीच सापळा लावला. एका वाहनातून रायटस नावाचे औषधीचे २० बॉक्स आल्याचे कळताच निरीक्षक बागवडे यांच्यासह पथकातील उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे यांच्या पथकाने छापा मारला. चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
नशेच्या औषधीचे पार्सल व्हीआरएल लॉजिस्टिकच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातून पाठवण्यात आले होते. तो माल छत्रपती संभाजीनगर येथे उतरला होता. पुढे हा माल मालेगावकडे पेडलर्सकडे पाठवण्यात येणार होता. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
औषधींचे पार्सल उतरून घेण्यासाठी चार पेडलर आले होते. हे पार्सल शहरासह मालेगावकडे पाठविण्यात येणार असल्याचे तपासात समोर आले. एक आरोपी चाळीसगावचा असून उर्वरित तिघे शहरातील असल्याचे समजते. चौघांवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कारवाईची माहिती बाहेर फुटू नये, यासाठी पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाइल तातडीने बंद करून कारवाई पूर्ण करण्यात आली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले हे देखील घटनास्थळी रात्री हजर होते.