

Fewer buses in Shravan, more crowd for darshan
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिना सुरू असल्याने श्री भद्रा मारुती व घृष्णेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दुसरीकडे एस.टी. बससेवा अत्यंत मर्यादित असल्यामुळ मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने भाविकांत नाराजी आहे. सध्या श्रावण मास सुरू असल्याने दर शनिवारी, रविवार व सोमवार खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती दर्शन व वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजी नगर व इतर ठिकाणावरून भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.
परिवहन महामंडळाकडून पुरेशा संख्येने बस उपलब्ध करून न दिल्याने भाविकांसह पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्याना बस सेवा कमी व वेळवर उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास खर्चिक ठरतोय आणि सर्वसामान्य भाविक अडचणीत येत आहेत. परिवहन मंडळाने या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
श्रावण महिन्याच्या काळात तरी जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. दर वर्षी श्रावण महिन्यात आम्ही दर शनिवारी श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी बसने प्रवास करत असतो.
यावर्षी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्या प्रमाणात बस गाड्या कमी पडत आहे. आम्हाला उभं राहून किंवा प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागतो, असे एका वृद्ध भाविकांनी सांगितले.
तीन दिवस तरी बससेवा वाढवा
भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी शनिवार रविवार व सोमवार साठी छत्रपती संभाजी नगर ते वेरूळ पर्यंत जास्त बस सेवा वाढवण्याची मागणी केली आहे. जर वेळेवर उपाययोजना न झाल्यास श्रावणात भाविकांचे हाल कायम राहील.
दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक श्रावण महिन्यात श्री भद्रा मारुती, घृष्णेश्वर महादेवच्या दर्शनासाठी येतात. यातील अनेक भाविक एसटी बसने येतात. रांगेत थांबून दर्शन झाल्यानंतर एसटी बस त्वरीत मिळावी अशी त्यांची माफत अपेक्षा असते मात्र अनेकदा बसची वाट पाहण्यात वेळ जात असल्याने भाविकांत नाराजी आहे. एसटीबसची संख्या या काळात वाढवावी अशी मागणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी केली आहे. दरम्यान, प्रवाशांनी मागणी केल्यास व आवश्यक वाटल्यास बस फेऱ्या वाढवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.