

Devdarshan Tours Package for Travelers of ST
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एसटी महामंडळाने खास प्रवाशांसाठी देवदर्शन टूर्स पॅकेजची घोषणा केली असून, ही सुविधा सोमवारपासून (दि.४) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये मध्यवर्ती बसस्थानक ते शनिशिंगणापूर, पैठण तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते मोहटादेवी पैठण या मार्गावर ६ देवस्थानांचे दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली.
पहिल्या पॅकेजमध्ये मध्यवर्ती बसस्थानकांतून सकाळी ७ वाजता देवदर्शन टूर्स पॅकेजची बस धावणार असून ती भद्रामारुती, वेरुळ, देवगड, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, पैठण येथून रात्री ९ वाजेपर्यंत मुख्य बसस्थानकांत परतणार आहे. हे पॅकेज फुल तिकीटासाठी ६२४ रुपये ते हाफ तिकीटासाठी ३१३ रुपये आकारण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या पॅकेजमध्ये सकाळी ७.३० वाजता मुख्य बसस्थानकांतून बस निघेल. ती भद्रा मारुती, वेरूळ, देवगड, शनिशिंगणा पूर, सोनाई, पैठण तेथून रात्री ८.३० वाजता परत मुख्य बसस्थानकांत पर-तणार. या मार्गासाठी फुल तिकीट ५१४ तर हाफ तिकीटासाठी २५८ रुपये आकारण्यात येणार आहेत.
या देवदर्शन टूर्स पॅकेजच्या बसमध्ये अमृत ज्येष्ठांना पूर्ण मोफत, ज्येष्ठ नागरिकांना व महिला सन्मान योजनेत ५० टक्के सुट या सवलती मिळणार आहेत. या टूर्स पॅकेजच्या वस पूर्ण श्रावण महिना चालणार आहेत. एसटीने प्रवाशांसाठी सुरु केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या वतीने करण्यात आले आहे.