

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील नवगाव येथील २६ वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि.५) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मेडिकल दुकान व शिक्षकाची नोकरी लावण्यासाठी माहेराहून अकरा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिचा सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. याप्रकरणी पैठण पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फातिमा बेगम सिद्दिखा पठाण असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेचे इन कॅमेरा शवविच्छेदन तपासणी करण्याच्या मागणीसाठी तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे व शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. तणावाची स्थिती लक्षात घेत महिलेचा मृतदेह पोलिस बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
मेडिकल दुकान टाकण्यासाठी व पतीला शिक्षकाची नोकरी लावण्यासाठी माहेरावरून अकरा लाख रुपये असे म्हणत सासरची मंडळी तिचा छळ करत होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासरचे मंडळी मारहाण करीत असे.
सततच्या त्रासाला कंटाळून फातिमा बेगम सिद्दिखा पठाणने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ शाकीर अब्दुल कदिरखान पठाण (रा. पिंपळगाव ता. माजलगाव जिल्हा बीड) यांनी पैठण पोलिस ठाण्यात दाखल केली.
पती सिद्दिकी इलियास पठाण, सासु रजियाबी इलियास पठाण, सासरा इलियास अहेमदखॉन पठाण, दिर इंद्रिस इलियास पठाण, जाऊ रुखैयाबी इद्रीस पठाण (सर्व रा. नवगाव) यांच्याविरुध्द पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.