

Even though Ambadi overflows, water supply to Kannad provided after ten days
संजय मूचक
कन्नड : शहराला पाणीपुरवठा करणारा कै. आप्पासाहेब नागदकर (अंबाडी) मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. शहराला दररोज लागणारे पाणी साठवण्यासाठी नगर परिषदेकडे पाण्याच्या पुरेशा टाक्याच उपलब्ध नसल्याने शहरातील नळ दहा-दहा दिवस कोरडेच राहतात. धरणात भरपूर पाणी साठा असतानाही नागरिकांना थेंबथेंब पाण्यासाठी धावपळ करावी लागते. धरण भरलेले असतानाही शहरवासीयांना आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अंबाडी प्रकल्प दरवर्षी किंवा एक-दोन वर्षाआड काठोकाठ भरून वाहतो, पण तरीही कन्नडकरांना पुरेशा पाण्यापासून वंचित राहावं लागत. जुन्या झालेल्या पाईपलाईन, कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आणि दुर्लक्षित नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच प्रतीक्षा करावी लागते.
सध्या जुन्या व नवीन शहरात केवळ सहा पाणीटाक्यांमधूनच पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या व नव्या वसाहती यामुळे या टाक्यांची क्षमता अपुरी पडते आहे. त्यामुळे अनेक भागांत नळाला पाणी येईपर्यंत नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागते. दर-वेळी तहान भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांच्या पाण्यासारखा महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प भरलेला असतानाही दहा दिवसांनंतर पाणी मिळते.
नवीन पाईपलाईन, आवश्यक इलेक्ट्रिक कामे, दो नशे के. व्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर व डी.पी. बसविणे, पंपिंग यंत्रणा खरेदी करणे, जलशुद्धीकरण प्रकल्पातील रेती बदलणे तसेच नवीन पाणीटाक्या उभारणे या उपाययोजना तातडीने राबविल्यास दर एक ते दोन दिवसांनी पाणीप-रवठा शक्य होईल, असे मत शहरातील नागरिकांचे आहे.