

Sambhajinagar More than 18 lakh tourist visits in six months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि जगप्रसिद्ध असलेली वेरूळ लेणी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सुमारे १८ लाखांपेक्षाही जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. यात विदेशी पर्यटकांची संख्या २३ हजारांवर होती तर देशी पर्यटकांच्या टक्क्यात वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटनांसाठी भारतातूनच नव्हे तर विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबीका मकबरा या पाच ठिकाणी १ जानेवारी ते १५ जूनदरम्यान एकूण १८ लाख २ हजार पर्यटकांनी भेटी दिल्या. यात देशी पर्यटकांचा टक्का चांगलाच वाढल्याने पुरातत्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जगप्रसिद्ध असलेली वेरूळ लेणी या ठिकाणी नेहमीच सर्वाधिक पर्यटक येतात. यावर्षीही वेरूळ लेणीला पर्यटकांनी प्रथम पसंती दिली आहे. या सहा महिन्यांत भारतीय आणि विदेशातून तब्बल ८ लाख २७ हजार ८४१ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात ८ लाख १८ हजार २५३ भारतीय तर ९ हजार ५८८ विदेशी पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली. जानेवारी ते जूनदरम्यान जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना सुमारे २३ हजार ४५८ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तर १७लाख ७८ हजार ५४२ देशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.