

Fear grips Khandala area after leopard sighting
खंडाळा, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावठाणालगत जानेफळ रोड बिरोबानगर परिसरात बिबट्याची दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मका सोंगण्यासाठी येणाऱ्या हार्वेस्टरच्या आवाजाने मकामध्ये दडून बसलेल्या बिबट्या बाहेर निघाला शेज-ारीच गव्हाला पाणी भरत असलेले शेतकऱ्यांनी व हार्वेस्टर चालकांनी बिबट्याला बघितले, परंतु तो पळून बांधावरील झाडाझुडपांमध्ये जाऊन बसला होता. सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले की, गावालगत असल्याने गावातील डुकरे शेतामध्ये मका व इतर पिकाची मालाची नासाडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने डुकरांच्या शिकारीसाठी बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे पोलिस पाटील नितीन बागुल यांनी घटनेची माहिती गावात दिली आहे.
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या बिबट्यांच्या सुळसुळतामुळे खंडाळा गावात हे बिबट्याने दर्शन झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले असून, परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी शेतामध्ये वस्ती करून राहत असल्याने व जनावरेही राहत असल्याने मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांमधून होत आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष
खंडाळा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतवस्तीवरील शेतकरी, शेतमजुरांमध्ये भिती पसरतील आहे. याआधीसुध्दा अनेकवेळा मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाकडे शेकतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.