

FDA Action: Dangerous 'trans fat' in the name of butter in Hotel Amarpreet!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवरील हॉटेल अमरप्रीतवर एफडीएकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये पथकाच्या तपासणीत विनालेबल मार्गारीनचा साठा सापडला. तसेच सडलेल्या भाज्या, खराब मशरूमसह एक्सपायर्ड 'पिझ्झा बेस' अशा ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर त्रुटी आढळून आल्याने या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. एफडीएच्या या कारवाईमुळे भेसळखोरांसह बड्या हॉटेल्स चालकांचेही धाबे दणाणले आहे.
सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू आहे. या अंतर्गत शहरातील जालना रोडवरील हॉटेल अमरप्रीतवर मंगळवारी अचानक छापा टाकत तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान हॉटेलच्या चिलिंग सेंटर व स्टोअर रूममध्ये सडलेला आणि खराब भाजीपाला आढळून आला.
याशिवाय मुदतबाह्य मशरूम आणि एक्सपायर्ड 'पिझ्झा बेस'चा साठा जप्त करण्यात आला. हॉटेलकडून 'फर्स्ट इन फर्स्ट आऊट' या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे हॉटेलमध्ये विनालेबल मार्गारीनचा मोठा साठा सापडल्याने बटर चिकन, बटर तंदुरी रोटी आणि ग्रेव्हीमध्ये लोण्याऐवजी या मार्गारीनचा सर्रास वापर केला जात असल्याचा दाट संशय आहे.
या मार्गारीनमधील 'ट्रान्स फॅट'मुळे हृदयविकाराचा मोठा धोका असतो. याशिवाय स्वयंपाकघरात साचलेले सांडपाणी आणि उघड्या कचराकुंड्यांमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे हॉटेलमध्ये किचन परवाना रद्द करत अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक विक्री व ग्राहक सेवा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. ही कारवाई अन्न प्रशासन सहआयुक्त श्रीकांत करकले, सहाय्यक आयुक्त डी. व्ही पाटील यांच्यासह पथकाने केली.
ग्राहकांच्या आरोग्याशी सुरू होता खेळ
हॉटेलमध्ये बटरच्या ऐवजी विनालेबलवाले मार्गारीन, सडलेल्या खराब भाजीपाला आणि मुदतबाह्य अन्न साठा वापरुन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. अन्न प्रशासनाच्या कारवाईत हॉटेलमधील हे बिंग फुटले. त्यामुळे अन्न प्रशासनाकडून या मोठ्या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला
किचन सुरू केल्यास कठोर कारवाई
हॉटेलकडून निलंबन कालावधीत नियम डावलून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे.