

Students in the same class; yet, grant records differ
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज-कमळापूर रोडवरील एका शाळेच्या आवारात तीन वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्रित वर्गात बसविले असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुदानित शाळेच्या स्टुडंट पोर्टलवर स्वयं-अर्थसहाय्यता जात शाळेतील विद्यार्थ्यांची नोंद करून शासनाकडून अनुदान लाटले जात असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी केला आहे.
नजमा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित नजमा उर्दू प्राथमिक शाळा, गोदावरी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि रेगल स्कूल या तिन्ही शाळांचे विद्यार्थी वाळूज कमळापूर रोडवरील एकाच आवारात बसविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नजमा उर्दू प्राथमिक शाळा अनुदानित असून, गोदावरी पब्लिक स्कूल स्वयं-अर्थसहाय्यता शाळा आहे. प्रत्यक्ष प्रवेश गोदावरी शाळेत देऊन ऑनलाईन नोंद मात्र नजमा शाळेच्या पोर्टलवर करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
दोन चौकशा, दोन अहवाल गंगापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर केला. यात संस्थाचालक वाहेद पठाण हे रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत अनुदानित शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे नमूद आहे.
तसेच अनुदानाचा गैरवापर, बनावट नोंदी व फसवणुकीबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आल्याचा दावा गरड यांनी केला. यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासणी केली. गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करीत, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सचिन गरड यांनी केली आहे.