Sambhajinagar News : शहरातील रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारांना दुरुस्तीची सक्ती

मनपा आयुक्तांचा इशारा : अमरप्रीत ते मोंढा नाका मार्गावरील पॅचवर्कचे काम सुरू
Chhatrapati Sambhajinagar EP maps
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

Contractors digging up city roads compelled to carry out repairs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः शहरात गॅस, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी रस्ते खोदून ते तसेच सोडणाऱ्या ठेकेदारांना आता रस्त्याची दुरुस्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्ता खोदल्यानंतर तो व्यवस्थित पूर्ववत न केल्यास बीपीसीएलला दिलेली ना हरकत रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला. दरम्यान, शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ९९ लाख रुपयांचे काम सुरू करण्यात आले असून, अमरप्रीत ते मोंढा नाका या वर्दळीच्या मार्गावरील खड्डे डीएलसी काँक्रिटीकरणाने बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी (दि.१२) प्रशासनाकडून देण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar EP maps
Student Portal : विद्यार्थी एकाच वर्गात; अनुदानाच्या नोंदी मात्र वेगळ्या !

शहरात गॅस, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी विविध रस्ते खोदले जातात. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांकडून रस्ते पूर्ववत केले जातात. मात्र अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता खोदण्याची परवानगी देतानाच त्यानंतरची दुरुस्ती व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी वॉर्ड अभियंत्यावर निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी रस्त्यांच्या दुरवस्थेचा आढावा घेताना आयुक्त येडगे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

प्रत्येक वॉर्डातील खड्ड्यांची मोजणी करून पॉटहोल यंत्रांची मागणी यांत्रिकी विभागाकडे नोंदवावी. यांत्रिकी विभागाने उपलब्ध यंत्रांचे नियोजन करून शहरातील विविध भागांतील खड्डे तातडीने बुजवावेत, असे आदेश त्यांनी दिले. तसेच शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेने अमरप्रीत ते मोंढा नाका या मार्गावरील खड्डे डीएलसी टाकून बुजवण्याचे काम सुरू केले आहे. तर हिमायत बाग परिसरातील खड्डा नुकताच बुजविण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar EP maps
Cattle Illegal Transportation : कत्तलीला निघालेल्या पाच गोवंशाची सुटका

पुढील कामे रखडू नयेत, यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी पॉटहोल यंत्रांचे आगाऊ नियोजन करून ठेवावे, असेही आयुक्तांनी सांगितले. यात महापालिकेची ना हरकत घेतल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने वॉर्ड अभियंत्याला पूर्वकल्पना देऊनच काम सुरू करावे. ना हरकत घेऊन तीन महिन्यांच्या आत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता व्यवस्थित दुरुस्त करून देण्याची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराचीच राहणार आहे. तर पाणीपुरवठा अथवा अन्य कामांसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती निकृष्ट झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची छायाचित्रे घेऊन तातडीने अहवाल सादर करावा. रस्त्याची दुरुस्ती समाधानकारक न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.

कामापूर्वी आणि नंतरची छायाचित्रे बंधनकारक

प्रत्येक निविदेच्या संचिकेसोबत काम सुरू करण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरची रंगीत छायाचित्रे जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. चुकीची अथवा प्रत्यक्ष कामाशी विसंगत छायाचित्रे जोडल्याचे आढळल्यास संबंधित अभियंत्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

९९ लाखांत बुजविणार खड्डे...

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ९९ लाख रुपयांचे काम सुरू करण्यात आले आहे. वॉर्डनिहाय खड्यांची मोजणी करून पॉटहोल यंत्राच्या साहाय्याने दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या प्रमुख रस्त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

यंत्रांचे आगाऊ नियोजन करा

खड्डे बुजविण्याचे काम यंत्राअभावी रखडू नये, यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी पॉटहोल यंत्रांचे आगाऊ नियोजन करून ठेवावे. यांत्रिकी विभागाने उपलब्ध यंत्रांचे योग्य नियोजन करून शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news