Crime News : ऑम्लेट विक्रेत्याला लुटणाऱ्या सराईत मुलाला वाचवण्यासाठी बापाचा पोलिस ठाण्यात राडा

मुकुंदवाडी ठाणेदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ; दोघा बाप-लेकाला बेड्या
Crime News
Crime News : ऑम्लेट विक्रेत्याला लुटणाऱ्या सराईत मुलाला वाचवण्यासाठी बापाचा पोलिस ठाण्यात राडाfile photo
Published on
Updated on

Father and Son Handcuffed for Lunging at and Abusing Mukundwadi Police Inspector

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रामनगर येथील हातगाडीवर खाल्लेल्या ऑम्लेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या बापाने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात राडा केला. मुलावर गुन्हा दाखल करू नये म्हणून या बापाने थेट पोलिस अंमलदार आणि पोलिस निरीक्षकांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२) रात्री ८ ते १० वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात दोघा बाप-लेकावर स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Crime News
Nida Khan arrested TCS case : नगरसेवक मतीन पटेलला सोबत घेऊनच रात्री फ्लॅटवर टाकली धाड

रवींद्र लहानू केदारे (रा. संजयनगर गल्ली नं. २१, मुकुंदवाडी) असे या राडा घालणाऱ्या बापाचे नाव आहे. तर धीरज रवींद्र केदारे असे लूटमार करणाऱ्या त्याच्या सराईत मुलाचे नाव आहे. दरम्यान, धीरज याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याचे वडील रवींद्रची हर्सल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

फिर्यादी कन्हैयालाल बाबुलाल लिधोरिये (६२, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांची रामनगर येथे ऑम्लेटची हातगाडी आहे. शुक्रवार (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास धीरज केदारे याने त्यांच्या गाडीवर ऑम्लेट खाल्ले. मात्र, लिधोरिये यांनी पैसे मागितले असता त्याने शिवीगाळ करत अंडे फेकून नासधूस केली.

Crime News
Crime News : वडगाव कोल्हाटीत हद्दपार आरोपीवर चाकूने जीवघेणा हल्ला

तसेच कांदे कापण्याच्या चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील २ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. या घटनेनंतर लिधोरिये यांनी मकंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून ड्यूटी ऑफिसर प्रशांत पासलकर यांनी तात्काळ कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या धीरज केदारे याला रामनगर येथील हरी ओम शोरूमजवळून शिताफीने ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले.

तुझ्यासारखे लय चिल्लर पोलिस बघितले

धीरजला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच त्याचे वडील रवींद्र केदारे तेथे पोहोचले. पीएसओ टेबलजवळ ड्यूटीवर असलेले पोलिस अंमलदार सागर शर्मा यांना त्याने माझ्या मुलाला इथे का आणले? असा जाब विचारला. शर्मा यांनी त्याला मुलाने एका वयोवृद्धाला लुटल्याची आणि त्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. हे ऐकताच रवींद्र भडकला. मी व माझा मुलगा दोघेही तडीपार राहिलो आहोत. कायदा आम्हाला माहिती आहे. तुझ्यासारखे लय चिल्लर पोलिस बघितले आहेत, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत त्याने शर्मा यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

ठाणेदाराच्या अंगावर धावून जात आत्महत्येची धमकी

रवींद्र केदारे याने आक्रमक होत थेट अंमलदार शर्मा यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार पाहून पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी त्याला अडवण्याचा व शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इंगोले यांच्याही अंगावर धावून गेला. माझ्या मुलाला आताच्या आता सोडा, नाही तर मी जालना रोडवर आत्महत्या करतो आणि तुम्हा सर्वांचे नाव घेतो, अशी थेट धमकी देत त्याने पोलिस ठाण्यात आरडाओरड आणि सामानाची फेकाफेक सुरू केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले.

दोघे बाप-लेक रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार

आरोपी धीरज केदारे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी ७ ते ८ जबरी चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याचे वडील रवींद्र केदारे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील जुना कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news