

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या बहुचर्चित कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणात गेले ४० दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी (दि.७) रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे, निदा खान आणि तिच्या कुटुंबाला एमआयएमचा स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यानेच हैदराबादचे नातेवाईक असल्याचे भासवून नारेगाव येथील फ्लॅटमध्ये आश्रय दिल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने बॉडीगार्डच्या चौकशीचा बहाणा करत मतीन पटेलला पोलिस आयुक्तालयात बोलून घेत त्याच्याच चौकशीतून लपंडावाचा पर्दाफाश केला असे सूत्रांनी सांगितले. मतीन पटेलला सहआरोपी करत त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक पोलिस निदा खानच्या मागावर होते. निदा तिच्या भावासह सोलापूर मार्गे संभाजीनगर शहरात दाखल झाली होती. शहरात प्रवेश करताच तिचा मोबाईल बंद झाला, मात्र शेवटचे लोकेशन नाशिक पोलिसांच्या हाती लागले. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी तत्काळ संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. आयुक्त पवार यांनी गुप्तता बाळगत केवळ उपायुक्त रत्नाकर नवले आणि पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, निदाचा भाऊ एमआयएमचा कार्यकर्ता असल्याने त्याने नगरसेवक मतीन पटेल याच्याशी संपर्क साधला होता. मतीनने एका मित्राच्या मध्यस्थीने हैदराबादचे नातेवाईक सांगून नारेगाव येथील एका नव्या फ्लॅटमध्ये त्यांना लपवले. पोलिसांची संशयाची सुई मतीनवर वळताच त्यांनी संशय येऊ नये म्हणून निवडणुकीत दिलेल्या पोलिस बॉडीगार्डसंदर्भात तुमचे अधिकृत स्टेटमेंट घ्यायचे आहे, अशी नोटीस देऊन गुरुवारी दुपारी त्याला आयुक्तालयात बोलावले. मतीन पोहोचताच पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि थेट निदा खानबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
सुरुवातीला मतीनने हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याच्याशी संबंधित एक जमीन खरेदीचे प्रकरण सांगताच तो तुटला. त्याने निदा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला आश्रय दिल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास मतीन पटेलला सोबत घेतले आणि नारेगावातील कौसर पार्क परिसरातील त्या फ्लॅटवर धाड टाकून निदा खानला ताब्यात घेतले.
हैदराबादचे नातेवाईक सांगून मिळवला फ्लॅट
निदा खानचा भाऊ हा एमआयएमचा कार्यकर्ता असून त्याचे नगरसेवक मतीन पटेल याच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने मतीनशी संपर्क साधून मदतीची याचना केली होती. त्यानुसार मतीनने एका मित्राच्या मोबाईलवरून निदाच्या भावाला संपर्क केला. त्यानंतर कैसर पार्क भागातील एका मित्राच्या मध्यस्थीने एजंटला फ्लॅट भाड्याने देण्याबाबत बोलणे केले. माझे हैदराबादचे नातेवाईक आहेत, त्यांना चावी दे, असे सांगून नारेगाव परिसरातील फ्लॅटमध्ये त्यांना लपवून ठेवले होते.
'त्या' बड्या नेत्याच्या भेटीने खळबळ
आश्रय दिल्यानंतर मतीन पटेल याने निदाची थेट एमआयएमच्या एका नेत्याशी भेट घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. तुला लवकरच जामीन मिळेल, असा विश्वासही या नेत्याने तिला दिला होता. या नव्या राजकीय कनेक्शनमुळे पोलिसांच्या तपासाचा फोकस आता छत्रपती संभाजीनगरवर केंद्रित झाला आहे.
इम्तियाज जलील यांच्या घरी पोलिस !
एमआयएम नगरसेवकाला सहआरोपी केल्याने राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शुक्रवारी (दि. ८) दुपारी अचानक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी इम्तियाज जलील यांच्या घरी धाव घेतल्याने चर्चेला उधाण आले. पोलिसांनी त्यांच्याकडे नेमकी काय विचारणा केली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकारी तिथे गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.