

Fatal attack on youth over old dispute
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाची कुरापत काढून एका २४ वर्षीय तरुणावर चौघांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१४) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर भागातील आनंदनगर परिसरात घडली.
निखिल अनिल बोराडे, शुभम अनिल बोराडे आणि दोन अनोळखी अशी आरोपींची नावे असून, बोराडे बंधूंना पोलिसांनी अटक केली आहे. आकाश बाबासाहेब गवळे (२४, रा. आनंदनगर) याच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास आकाश हा गल्ली क्रमांक १४ मधील बजरंग किराणा दुकानासमोर फोनवर बोलत उभा होता.
यावेळी निखिल बोराडे, शुभम बोराडे आणि त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी मागून येऊन आकाशला गाठले. जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली. दोन अनोळखी इसमांनी आकाशला घट्ट पकडून ठेवले, तर निखिल बोराडे याने दांड्याने मारहाण केली.
याचवेळी शुभम बोराडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने आकाशच्या डोक्यावर रॉडने जोरात प्रहार केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. जखमी आकाशवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.