

Sub-inspector tortures young woman who went to report missing mobile phone
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार अत्याचार केला आणि तिची इच्छा नसताना तीन वेळा गर्भपात घडवून आणला. हा प्रकार ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी या काळात घडला.
निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अत्याचार करणारा उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, पीडितेला मारहाण करणारी त्याची पत्नी आणि मुलगा या तिघांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी मार्च २०२५ मध्ये तिचा मोबाईल हरवल्याने तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेली होती. तिथे कार्यरत असलेल्या पीएसआय चव्हाणने मदतीचा बहाणा करून तिचा संपर्क क्रमांक मिळवला.
पुढे मोबाईल सापडला आहे, असे सांगून तिला शहरात बोलावले आणि रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. मी पोलिस अधिकारी आहे, तुझे काहीही चुकीचे करणार नाही, असे भासवून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता आर-ोपीने तिला अहिल्यानगर येथे नेले आणि तिथे बनावट मंगळसूत्र घालून लग्नाची खोटी हमी दिली. या दरम्यान पीडिता तीन वेळा गर्भवती राहिली, मात्र आरोपीने तिला धमकावून तिचा गर्भपात घडवून आणला.
काही दिवसांनंतर पीडितेने पुन्हा लग्नाचा विषय काढला असता आरोपीने तू खालच्या जातीची आहेस, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे, तर आरोपीची पत्नी आणि मुलानेही पीडितेला गाठून बेदम मारहाण केली आणि तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या मारहाणीत पीडितेचा तिसऱ्यांदा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास एसीपी सागर देशमुख करत आहेत.