

Farmers in Kannada taluka did not get urea, supply less than demand
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला आहे. काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने वेळोवेळी हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिके जोमात आली आहे. श्रावणात पावसाची काही मंडळात अतिवृष्टी झाली तर काही भागात समाधान कारक पाऊस झाल्याने आता पिकांसाठी रासायनिक खतासह युरिया खतांची मात्रा देण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला असून युरिया चा वापर जास्त प्रमाणात वाढला असल्याने मागणी पेक्षा पुरवठा कमी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या गोणी चे भाव वाढलेले असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया खताचा वापर केल्या शिवाय पर्याय नाही. तर पर्यायी नॅनो युरिया चा वापर शेतकऱ्यांनी करावा असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
युरियासाठी कृषी सेवा केंद्रावर गेल्यावर युरिया शिल्लक नसल्याचे सांगतात तर काही ठिकाणी किमती पेक्षा जास्त पैसे दिल्यास एक किंवा दोन गोणी दिली जाते नाहीतर इतर दुसऱ्या खताची सक्ती केली जाते अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, कृषी विभागाने थेट कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.