

Now city residents will get additional 26 MLD of water
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने (७५ एमएलडी) पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यामुळे शहराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी मिळणार असून, या पाण्याचे आज (दि.१९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन होणार आहे. या वाढीव पाण्यामुळे शहरातील पाण्याचा खंड एक दिवसाने कमी होणार आहे.
फारोळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये राज्य शासनाच्या १९२ कोटी रुपयांच्या योजनेतून २६ एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्राच्या कामासाठी मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाकडून सतत कंत्राटदार एजन्सीकडे पाठपुरवठा केला जात होता. गेल्या महिन्याभरात प्रशासक जी. श्रीकांत यांनी ४ वेळा फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा दौरा केला.
कामाची पाणी करून कंत्राटदाराला सूचना केल्या. या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी यशस्वी झाली असून, नक्षत्रवाडी येथील एमबीआरमध्ये पाणी आले आहे. फारोळा येथील दोन पंप सुरू ठेवण्यात आले आहे. नक्षत्रवाडीच्या एमबीआरमधून पाणी वितरण केले जात आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फारोळा येथे तळ ठोकून आहेत. सध्या शहराला ५६ दललि, १०० दललि योजनेतून १३३ एमएलडी पाणी मिळत आहे. आता ९०० तून ६८ एमएलडी मिळणार आहे.
शहरातील ६० टक्के वसाहतींना सध्या ५ दिवसांआड, २० टक्के वसाहतींना ७ ते ८ दिवसांआड आणि उर्वरित २० टक्के वसाहतींना १० ते १२ दिवसांआड पाणीपुरावठा होतो, तेथे आता एक दिवसाने खंडकाळ कमी होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या दोन्ही योजनेचे ३० जलकुंभ आहेत. या जलकुंभाची पाणी साठवण क्षमता साधारणपणे ६० लाख लिटर इतकी आहे. एमजेपीने ५३ पैकी ४ जलकुंभ मनपाच्या ताब्यात दिले असून, उर्वरित ६ जलकुंभांची महापालिकेला प्रतीक्षा आहे.