

Farmers block road in support of Mangesh Sable
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांचे सिल्लोड तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषण शनिवारी (दि. ४) सहाव्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान शुक्रवारी (दि. ३) पालकमंत्र्यांनी फोनवरून भरघोस मदतीचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र दिलेल्या आश्वासनानंतरही साबळे उपोषणावर ठाम राहिले. शनिवारी शहरातील डॉ. आंबेडकर चौकात विविध पक्षांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपोषणाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केले. तर आज रविवारी (दि. ५) शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करून प्रति एकर ५० हजारांची सरसगट मदत द्यावी. शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाखाची मदत द्यावी. पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर ५० हजार द्यावे. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खत मोफत उपलब्ध करून द्यावे. २०२५- २६ शैक्षणिक वर्षात शेतकऱ्यांच्या मुलांचे शुल्क माफ करावे, अशा विविध मागण्यांसाठी मंगेश साबळे सोमवारपासून (दि. २९) उपोषणाला बसलेले आहेत.
शुक्रवारी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी यांनी मंगेश साबळे यांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. तर लतीफ पठाण यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाईल, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र यानंतरही मंगेश साबळे उपोषणावर ठाम राहिले. तर आता मंगेश साबळे यांची प्रकृती खलावली आहे.
उपोषणाच्या समर्थनार्थ शुक्रवारी तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर शनिवारी डॉ. आंबडेकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रविराज साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे, काँगेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शेख शफिक, कॉम्रेड अनिस सय्यद, शेख उस्मान, राष्ट्रवादीचे शेख अमान, संभाजी ब्रिगेडचे विजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, विकास जाधव, नारायण लोखंडे, साईनाथ पाटील आदी विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते.