

Tortured by son and daughter-in-law; Mother gets justice
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आईला तिच्याच लेकराने घराबाहेर काढले, तिचा छळ केला. मात्र आई-वडील व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ या कायद्यामुळे ६५ वर्षीय महिलेला न्याय मिळाला.
भागाबाई (नाव बदलले) यांनी २००४ मध्ये आपल्या भावाकडून ७५ हजार रुपये देऊन रेल्वेस्टेशन रोडलगत राहुलनगर येथे ६०० चौ. फूट जागा विकत घेतली. त्यावर दोन खोल्यांचे स्वतःचे घर उभारले. या घरात सुरक्षित वृद्धापकाळ घालवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र त्यांचा मुलगा पंकज (नाव बदलले) आणि सून रुचिका (नाव बदलले) यांनीच त्यांच्या आयुष्याला नरक बनवले. सुरुवातीला शिवीगाळ, भांडणे झाली.
नंतर हा छळ शारीरिक त्रासात बदलला. २०२० मध्ये तर त्यांच्या कानाला चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. त्या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्येही ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीसुद्धा त्रास थांबला नाही. पतीने आयुष्यभर साथ दिली नाही. दुसरा विवाह करून त्यांनी भागाबाईंना दुर्लक्षित केले. आता मुलानेही साथ सोडली. आरोग्याच्या समस्या, शुगर, बी.पी. यामुळे कामधंदा करणे अशक्य झाले.
न्यायासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा २००७ अंतर्गत अर्ज दाखल केला व जिल्हा विधी प्राधिकरणाकडे वकिलाची मागणी केली. त्यांच्या वतीने अॅड. डी. व्ही. मोरे मेश्राम यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान मुलगा व सून हजर राहिले नाहीत. त्यांनी न्यायालयाची नोटीस स्वीकारण्यासही नकार दिला. त्यामुळे प्रकरण एकतर्फी निकाली काढण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी व ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व्यंकट राठोड यांनी सुनावणीअंती राहुलनगर येथील घराचा ताबा पुन्हा भागाबाई यांच्याकडे सोपविण्यात यावा, असे आदेश दिले. हा निर्णय मिळाल्यावर भागाबाईंच्या डोळ्यांत अश्रू तराळले.
भागाबाईंच्या नावावरची मालमत्ता असतानाही मुलगा व सुनेने खोटा करारनामा करून घर आपले असल्याचा दावा केला. या दबावाखाली त्यांना घराबाहेर काढण्यात आले. त्यामुळे भागाबाई गेली तीन वर्षे कधी भावाकडे, कधी बहिणीकडे, तर कधी इतरांच्या दयेवर राहत होत्या. स्वतःचे घर असूनही बेघर होणे ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी शोकांतिका होती.