

Congress opposes Maratha reservation, taking advice from Rahul Gandhi Manoj Jarange
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधी सांगत आहेत म्हणूनच विजय वडेट्टीवारसारखे नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. असा थेट आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड आहे का? असा प्रश्न शनिवारी (दि.४) शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. काँग्रेसने जर अशी भूमिका घेतली, तर येणाऱ्या काळात पक्षाचा सुफडा साफ होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आज काही जातींच्या लोकांशी बैठक घेतल्याचे समजते, पण अशा जातीयवादी लोकांचे सल्ले ऐकून मराठा पोरांचे नुकसान होईल, असे निर्णय घेऊ त्यांनी नयेत. अशा निर्णयांचा परिणाम गंभीर होईल. जास्त बोलत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी यांची बैठक बोलावली.
त्या काँग्रेसवाल्यांना सांगा? आजच्या बैठकीला जाणारे नेते हे ओबीसींचे नेते नाहीत. तर केवळ त्यांच्या त्यांच्या जातींचे प्रतिनिधी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. ते संपूर्ण माळी समाजाचे नेता नाहीत, केवळ काहींचेच आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. जरांगे म्हणाले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसांना मुंडक्यावर पाडणार आहे. त्याला काही दिल तर ठीक नाही तर हा कारवाई करतो. असा मंत्री बावनकुळे यांचा उल्लेख करत, आता मी पण यांच्या मागे लागतो, यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतो. कारण हा मराठा अधिकाऱ्यांच्या मागे लागला आहे.
तसेच मंत्री छगन भुजबळ यांचाही एकेरी उल्लेख करत, तो नरकासूर आहे, त्याने जातीचा खेळ केला आहे, याला त्या पदावर ठेवायला नाही पाहिजे, असे जरांगे म्हणाले. १० ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मेळाव्यावर त्यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी आहे. प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करत जरांगे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात २ लाख २४ हजार कुणबी होते, ते अचानक कुठे गेले? सरकारने याचे उत्तर द्यावे. मजा बघू नका नाहीतर तुमच्या नरड्यावर येईल.
हैदराबाद गॅझेटच्या आधारावर काढलेला कुणबी प्रमाणपत्राचा जीआर रद्द करणे सरकारला शक्य नाही. त्यावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल. यासोबतच आता जशास तसे उत्तर मिळणार असून आमची सरकारकडे मागणी आहे, १९९४ चा जीआर तत्काळ रद्द करावा आणि मंडल आयोगात ज्या जाती चुकीने समाविष्ट झाल्या, त्या आयोगातून बाहेर काढाव्यात.
ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर, जरांगे म्हणाले, अनेकांनी फुकट आरक्षण खाल्ले, त्यामुळे त्यांचे रक्तही बोगस झाले. मराठ्यांचा खरा शतू उघड झाला आहे. त्यामुळे कट्टर मराठा बनून विरोधकांना राजकीय संपवा. मराठ्यांच्या लेकरांच्या अडचणी दूर करायच्या आहेत. २-४ हजारांसाठी कोणाच्या मागे पळू नका, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.