

छत्रपती संभाजीनगर : पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तोतयाने २४ वषीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर अत्याचार केला. प्रकरणात आरोपी अमित लालखा तडवी (२४, रा. गोंदेगाव, ता. जामनेर, जि. जळगाव ह.मु. छत्रपती संभाजीनगर) याला १० वर्षींची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी शुक्रवारी (दि.२७) ठोठावली. आरोपीला ठोठावलेल्या दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रकरणात २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार पीडिता ही आई आणि लहान भावासोबत राहते. फेब्रुवारी २०२३ पासून आर-ोपी अमित तडवी हा पीडितेच्या घरात किरायाने राहात होता. दरम्यान, मे २०२३ मध्ये पीडितेच्या आईचा अपघात झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी अमित त्यांना मदत करीत होता. त्यामुळे त्याची पीडितेशी मैत्री झाली. तेव्हा त्याने पीडितेला पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून ओळख वाढविली होती. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
यादरम्यान, १९ सप्टेंबर २०२३ रोजी पीडिता घरात एकटी असल्याचे बघून आरोपीने बळजबरी तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडिता, तिचा लहान भाऊ व आरोपी आणि त्याचा मित्र २२ सप्टेंबरला २०२३ रोजी मुंबईला गेले होते. तेथे काही फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा पीडितेला ब्लॅकमेल करून अत्याचार केला.
दरम्यान, त्याची तोतयेगिरी समोर आल्यावर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतरही त्याच्या मित्राने पीडितेला फोन करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक विजय साळवे आणि अभिमन्यू सानप यांनी काम पाहिले. खटल्यात अॅड. बागूल यांना, अॅड. मोनाली बागूल, अॅड. अक्षय तिळवे यांनी सहकार्य केले.
११ साक्षीदार तपासले
प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक ई. एस. कामठे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३७६ (२) (एन) मध्ये दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजारांचा दंड, कलम ४१७ आणि कलम १७० अन्वये एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी २ हजारांचा दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिन्यांचा कारावास आणि १ हज-राराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.