

छत्रपती संभाजीनगर : शहागंज भागात व्यापाऱ्यांकडून गर्भवती महिलेला झालेल्या मारहाणीनंतर महापालिकेने राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाली आहे. गुरुवारी उपमहापौरांच्या सूचनेनंतर झालेली कारवाई शुक्रवारी (दि. २७) एमआयएमच्या नगरसेवकांनी मोडीत काढली.
पथविक्रेत्यांच्या समर्थनार्थ एमआयएम नगरसेवक रस्त्यावर उतरल्याने शहागंजमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. विशेष म्हणजे, या नगरसेवकांनी महापालिकेच्या पथकालाच हुसकावून लावल्याने, अतिक्रमणाला पाठिंबा देणाऱ्यांचे नगरसेवक पद रद्द करा, अशी आक्रमक मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेला शहागंज परिसर पुन्हा एकदा हातगाड्यांच्या वादाने पेटला आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर गुरुवारी प्रशासनाने या भागातील ३५ शेड जमीनदोस्त करत ३० हातगाड्या जप्त केल्या होत्या. या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी एमआयएमचे नगरसेवक धावून आले आहेत.
महापालिकेचे पथक गुरुवारी व शुक्रवारी या भागात तळ ठोकून होते, मात्र सायंकाळी विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्यासह एमआयएमचे १७ नगरसेवक शहागंजमध्ये धडकले. आयुक्तांनी हातगाड्या लावण्यास परवानगी दिली आहे, असे सांगत त्यांनी महापालिकेच्या पथकाला तिथून जाण्यास भाग पाडले आणि पथविक्रेत्यांना पुन्हा हातगाड्या लावण्याच्या सूचना केल्या.
या घटनेनंतर महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तातडीने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी हातगाड्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आणि मुख्य रस्त्यांवर नो एन्ट्री करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपमहापौर जंजाळ यांनी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी संपर्क साधून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि अतिक्रमणाला खतपाणी घालणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केली.
मे २०१८ मध्ये शहागंज भागात याच हातगाड्यांच्या वादावरून मोठी दंगल झाली होती, ज्यात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही प्रशासनाला येथील पथविक्रेत्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता आले नाही. आता गर्भवती महिलेला झालेल्या मारहाणीच्या निमित्ताने हा परिसर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहागंज ते सिटी चौक या केवळ एक किलोमीटरच्या अंतरात तब्बल ५०० हून अधिक हातगाड्या उभ्या असतात, ज्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
नगरसेवक पद रद्द करा - "अतिक्रमण हटावण्याच्या शासकीय कारवाईला ज्या नगरसेवकांनी विरोध केला, त्यांच्यावर नियमानुसार पद रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. आयुक्त जी. श्रीकांत यांना पत्राद्वारे त्या १० नगरसेवकांचे पद रद्द करण्याची रीतसर सूचना केली जाणार आहे. अन्यथा शहरात अतिक्रमण हटावण्याच्या मोहिमेला असाच राजकीय विरोध होत राहील."
राजेंद्र जंजाळ, उपमहापौर
रमजानमध्ये कारवाई नको- "सध्या रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. पथविक्रेते फळे आणि इतर साहित्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. काही व्यापाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा सरसकट सर्व पथविक्रेत्यांना देऊ नका. इफ्तार आणि सहरीसाठी फळांची आवश्यकता असते. त्यामुळे रमजान संपेपर्यंत ही कारवाई थांबवावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे."
समीर साजेद बिल्डर, विरोधी पक्षनेते