

Fake call center investigation likely to be closed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या कॉल सेंटरवर प्रकरणात आतापर्यंत केवळ केवळ ६ पीडित परदेशी नागरिकांचे नावे समोर आली आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय, फसवणुकीचा आकडा काय, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असतानाच तपास गुंडाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या गुन्ह्यातील शेवटचे दोन आरोपी फारूख शहा आणि राजविर वर्मा यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी (दि.८) न्यायालयात हजर केले. असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
फारूखचे कृत्रिम केस
आरोपी फारुखने अॅड. पद्मभूषण परतवाघ यांच्यामार्फत न्यायालयासमोर डोक्यावरील कृत्रिम केसाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करून तज्ञाकडे जाण्याची परवानगी मागितली. कोटनि हा निर्णय नियमानुसार हर्सल जेल प्रशासनाने घ्यावा असे आदेश दिले.
पोलिस अधिकाऱ्यांबाबत चर्चेला उधाण
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणात चार वरिष्ठ पोलिस अधिकारी व एका बँक अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अमेरिका व कॅनडा येथील नागरिकांना फसवणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. यात कॉल सेंटरच्या संरक्षणच्या बदल्यात त्यांना या कॉल सेंटर मालकाकडून लाच दिली जात असल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. तोच पॅटर्न शहरातील कॉल सेंटरमध्ये देखील असल्याची चर्चा आहे.