

Devendra Fadnavis on Local Body Election : "नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबराब राबतात हाडाचे पाणी करतात त्यांच्या निवडणुकीत आपण फिरायचे नाही, त्यांना मदत करायचे नाही ही गोष्ट योग्य नाही. मुळेच मी तसा प्रयत्न करतो आहे. नगरपालिका निवडणूक प्रचारात मी मित्रांवर टीका केलेली नाही. मित्र पक्षांवर तर सोडा मी विरोधकांवरही टीका केली नाही. माझं एक वाक्य सांगा की, मी एखाद्या नेत्याच्या आणि पक्षाचे विरोधात बोललो. या निवडणुकीतील प्रचारात मी सकारात्मक मत मांडत आलो आहे. त्यामुळे कुणावर टीका करत नाही. मी कुणावर बोलत नाही बोलण्याचे कारणही नाही," अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर पंचायत निवडणुकीत महायुतीमध्ये मित्र पक्षांतील परस्पर टीकेवर आपलं मत व्यक्त केले. ते संभाजीनगर येथे बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला निवडणूक आयोगाच्या छाप्या बद्दल माहिती नाही. सत्तेत कोणीही असो यावरून छापे ठरत नसतात. आमच्याही कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रार आली तर चौकशी होते, अनेकवेळा माझीही गाडी तपासण्यात आली.
मी रात्री उशिरा आलो आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा लवकर निघालो. त्यांची सभा माझ्यानंतर एक तासाने आहे. त्यामुळे भेट झाली नाही आम्ही उद्या भेटू. सध्या दोघेही प्रचारात मग्न आहोत. फोनवर आमचे दररोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही एवढेच, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
नगर परिषदांमधील काही प्रभांगाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका स्थगित करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला माझा अभ्यास आहे. वकिलांसोबत बोललो त्या सगळ्यांच्या मतानुसार, असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाही. निलंग्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले होते तो न्यायालयात गेला. त्याचे नामनिर्देशन रद्द झाले; मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे."
असा कुठला सर्वे मला माहित नाही; पण नंबर एकचा पक्ष भाजप राहील. आमचे दोन्ही मित्र पक्ष त्याच्या खालोखाल राहतील. या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष मिळून 70 ते 75 टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात आम्ही आमचे काम करतो; पण कुणीही आमचा शत्रू नाही. ते राजकीय विरोधक आहे. कुठलाही राजकीय विरोधक आजारी पडला तर तो लवकर बरा झाला पाहिजे ही आमची भावना आहे. आहे. ते रोज काही काही बोलतात त्यावर मी उत्तर देत नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
मी सर्वांच्या पाठीशी आहे. कोणी चुकत असेल तर मी त्यांना सांगेन;मग तो माझा पक्षातला असला तरी त्याला मी सांगेन. खरंतर दोन्ही बंधूंमधील परिस्थिती चांगली नाही. राणे विरुद्ध राणे हे चांगले नाही. नगर पंचायत निवडणुकीनंतर आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे आवाहनही फडणवीसांनी केले.