

External staff at all centers for copy-free
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाही इयत्ता दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जाणार आहे. कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी यावेळी सर्वच केंद्रांवर बाहेरचे शिक्षक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रावरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सध्या मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे.
राज्य मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी-बारावी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. त्यानुसार मंडळस् तरावर पूर्वतयारीचे काम सुरू आहे. यासंदर्भात राज्य मंडळाची नुकतीच बैठक पार पडली. त्यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी राबवायच्या विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. दरवर्षी ज्या शाळेत परीक्षा केंद्र असते, तिथे त्याच शाळेचे शिक्षक कर्मचारी तैनात केले जातात.
परंतु यावेळी सर्वच परीक्षा केंद्रांवर त्या त्या शाळेचे शिक्षक कर्मचारी नियुक्त न करता इतर शाळांचे कर्मचारी नियुक्त करण्याबाबत मंडळाच्या बैठकीत ठरले. त्यानुसार सध्या नियोजन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. याशिवाय यावेळी सर्व परीक्षा केंद्रांवर सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या सीसीटीव्हींचे फूटेज साठवून ते पेनड्राव्हईमध्ये बोर्डाकडे जमा करण्यास सांगण्यात येणार आहे.
गतवर्षी छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत इयत्ता दहावीचे ६४४ केंद्र होते. तर बारावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ४६० इतकी होती. या सर्व केंद्रांवर भरारी पथकांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यातील अनेक केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून आले होते. त्यामुळे यंदा बारावीच्या ४४ आणि दहावीच्या १२ केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात आली. मात्र अद्याप यंदाची परीक्षा केंद्र निश्चिती झालेली नाही. लवकरच ही केंद्रे निश्चित करण्यात येणार आहेत.
राज्यभरातील १२४ केंद्रांवर गैरप्रकार
गतवर्षी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. भरारी पथकांच्या माध्यमातून विविध केंद्रांवर तपासणी करण्यात आली. त्यात राज्यभरातील १२४ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे आढळून आले होते. नऊ विभागीय मंडळांपैकी ५ विभागांमध्ये कॉपीचे प्रकरणे आढळून आली. या सर्व प्रकरणांची पडताळणी पुणे व विभागीय मंडळ कार्यालयांकडून करण्यात आली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले, त्यांची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगाने राज्य मंडळ पुणे स्तरावरून सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आले आहे.