

Child dies after drowning in water pipline pit: Demand to register a case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देवळाई परिसरात जलवाहिनीसाठी टाकलेल्या खड्यात पडून साडेतीन वर्षीय ईश्वर संदीप भास्कर या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत बळी गेलेल्या भास्कर कुटुंबाने मूळ गावी न परतता त्यांनी शहरातच मुलाचे अंत्यसंस्कार केले.
त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांची गुरुवारी (दि.४) भेट घेत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंताना कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात पाईप टाकल्यानंतरही खड्डा बुजवण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी माती न टाकता पाईपही अर्धवट टाकले आहेत.
त्यामुळे या कामाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावर हकीम पटेल, सलीम हसन शेख आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशीही त्या खड्याला संरक्षण जाळी किंवा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. कॉलनीतील मुख्य मार्गावर हा खड्डा असल्याने मुले, विद्यार्थी, नागरिकांची वर्दळ असते. चिमुकल्याचा बळी गेल्यावरही प्रशासनाने उपाययोजना न केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.