

Engineers' association condemns 'that' attack
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता इंजि. विठ्ठल गावंडे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला केल्याच्या घटनेचा राजपत्रित अभियंता संघटना आणि कनिष्ठ अभियंता संघटनेने तीव्र निषेध केला आहे. शासकीय कामाचे बिल नियमबाह्यरीत्या मंजूर करून घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा आरोप संघटनांनी केला असून, संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, जलसंपदामंत्री आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले. यावेळी गोदावरी पाटबंधारे कार्यालयात शेकडो अभियंते व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत संबंधित कंत्राटदाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील त्यांची नोंदणी रद्द करावी आणि कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी संघटनांनी केली. तसेच उपअभियंता गावंडे व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली.
राजपत्रित अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि. अविनाश उल्हाणे, कार्याध्यक्ष इंजि. प्रल्हाद पाठक, सरचिटणीस इंजि. महेश देशमुख, कनिष्ठ अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि. उन्मेश मुडबिद्रीकर आणि प्रभारी सरचिटणीस इंजि. सुरेश भांगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शासनाने या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई न केल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला