

Encroachments in Jayakwadi to be removed today
पैठण, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून पैठण पाटबंधारे विभागाच्या जागेवरील जायकवाडी उत्तर, जायकवाडी दक्षिण येथील शासकीय निवासात वास्तव्यास असलेल्या कुटुंबासह नाथसागर धरण परिसरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण सोमवारी (दि. सात) काढण्यात येणार आहे. यामुळे वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांचा संसार थंडीच्या दिवसांत उघड्यावर येणार आहे.
या शासकीय जागेवरील व निवासस्थानात झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहे. परंतु स्थानिक पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे वेळकाढू भूमिका घेतली होती. घरण परिसरात नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ जमीनदोस्त करण्याची मोहीम राबविण्याचे सूचना दिल्याने. येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याच्या वारंवार नोटिसा बसविण्यात आलेल्या असताना देखील अतिक्रमणधारक अतिक्रमण काढीत नसल्याने शेवटी सोमवार रोजी पोलिसाच्या मदतीने अतिक्रमण निष्कासित करण्याची मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पर्यायी व्यवस्था करून पुढील कारवाई करावी, अशी मागणी या ठिकाणी वास्तविक असलेल्या कुटुंबांकडून करण्यात येत आहे.